पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेकडील उमराले गावात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. येथील भूपेश पाटील यांच्या कुटुंबाने दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेनुसार अत्यंत थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडले.
टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकरी परंपरा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत वारकरी संप्रदायातील बाल गोपाळ आणि कुटुंबातील सदस्यांचा मोठा उत्साह दिसून आला. टाळ, मृदंग आणि भजनाच्या तालावर भाविक तल्लीन झाले होते. या प्रसंगी विविध पारंपरिक खेळ खेळत आणि फुगड्या घालत बाप्पाला निरोप देण्यात आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते.
भावुक वातावरणात ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दीड दिवस लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोप देताना भाविकांचे डोळे अश्रूंनी पाणावले. अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात गणरायाचे जलविसर्जन करण्यात आले.












